‘आवड म्हणून बागकामाला सुरवात केली, बघता बघता ३० – ४० कुंड्याची छोटी बाग घरात फुलली. फुलांचा बहर,पानांचा गर्द हिरवा रंग खूप मानसिक समाधान मिळू लागलं. हळू हळू रोपं मोठी होवू लागली आणि त्या सोबतच या आधी न दिसलेले काही वेगळे बदल रोपांमध्ये व कुंडीतील माती मध्ये प्रकर्षाने दिसू लागले. रोपांची वाढ थांबली, पानं पिवळसर आणि कमी तजेलदार दिसू लागली, कुंडीतून पाण्याचा निचरा त्वरित होवू लागला. तसंच रोपांच्या मुळांनी माती अगदी घट्ट पकडून ठेवलेली दिसली तर काही रोपांची मुळे कुंडीतून वर डोकवायला लागली. या पूर्वी दीड - दोन वर्षांत असं कधीच झालं नाही.’
वरील अनुभव बऱ्याच बागकामप्रेमीना येत असतो, अशा वेळी ही रोपं आपल्याला सांगत असतात की त्यांना आता मोठ्या जागेची म्हणजेच पुन:रोपण (Re potting) करण्याची गरज आहे. एकाच कुंडीत झाडं अनेक महिने राहिल्यामुळे त्यांची मूळं सर्वत्र पसरून त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. त्यामुळे झाडं वाढून मोठी व्हायला लागली तर मोठ्या आकाराच्या कुंडीत बदलणे आवश्यक ठरते. म्हणून दर वर्षी झाडांची अवस्था बघून गरज भासल्यास कुंडी बदलावी.
जेव्हा वातावरणात थंडावा आणि आर्द्रता मुबलक असते तेव्हा पुन:रोपण करणे योग्य ठरते आणि अशी स्थिती पावसाळ्याच्या सुमारास दिसून येते. पावसाळ्यातील अनुकूल परिस्थिती व हवामानामुळे झाडांना शॉक कमी बसतो. प्रखर ऊन आणि कोरडं हवामान पुन:रोपण करण्यासाठी बऱ्याचवेळा घातक ठरू शकतं; त्यामुळे काही कारणास्तव उन्हाळ्यात पुन:रोपण करावं लागलंच तर अशा वेळी नव्या कुंडीतील रोपं काही दिवस सावलीत ठेवायला हवीत.
पावसाळ्याची चाहूल लागताच पुन:रोपणाच्या तयारीला सुरवात करावी. त्यासाठी लागणारं साहित्य जसे नवीन कुंड्या, मातीचे मिश्रण, विटांचे तुकडे, नारळ्याच्या किश्या इत्यादी गोळा करावेत.
साधारणपणे ज्या झाडाचं पुन:रोपण करायचं आहे त्याच्या मूळ कुंडी पेक्षा १ – २ साईज मोठी कुंडी घ्यावी. म्हणजेच जर ८ इंच व्यासाची मूळ कुंडी असेल तर किमान १० किवा १२ इंच व्यासाची नवीन कुंडी पुनःरोपणासाठी निवडावी.
नव्या कुंडीचा आकार १ साईज मोठा असावा |
त्यानंतर योग्य मातीचं मिश्रण बनवण्याची कृती करावी. शक्यतो कुंडीत केवळ मातीमध्ये रोप लावणे टाळावे कारण साधारण मातीमध्ये रोप लावल्यास बऱ्याच वेळा मूळं कुजतात व रोप दगावण्याची शक्यता असते. मिश्रण तयार करताना माती (पोयटा) : रेती (नदीकाठची वाळू) : सेंद्रिय खत (शेणखत किंवा कंपोस्ट) ह्यांचे १:१:१ हे प्रमाण घेवून त्यात मुठभर नीम पेंड घालावी. या मिश्रणाची पाण्याचा योग्य निचरा करण्याची क्षमता चांगली असते. तसंच ज्या रोपांना पाणी धरून ठेवणारं मिश्रण लागतं त्यासाठी गरजेनुसार या मिश्रणात मातीचं प्रमाण वाढवू देखील शकतो. पण मिश्रणात रेतीचा वापर केल्यामुळे कुंडीचं एकूण वजन वाढतं अशावेळी शहरात जिथे खिडकी मध्ये बागकाम करायचं आहे, तिथे हलक्या वजनाचे मिश्रण वापरावे.
मातीचं मिश्रण हलकं करण्यासाठी रेती ऐवजी कोकोपीट चा वापर केला जाऊ शकतो. कोकोपीट हे तंतुमय, आणि स्पंज सारखं हलकं असतं, त्यामुळे एकूणच मिश्रणाचं वजन हलकं होण्यास ह्याचा वापर योग्य ठरतो. मिश्रण तयार करत असताना माती (पोयटा) : कोकोपीट (loose cocosoil) : सेंद्रिय खत (शेणखत किंवा कंपोस्ट) यांचे २:१:१: प्रमाण घ्यावे. या मिश्रणात मातीतील अपायकारक घटक नियंत्रणासाठी मुठभर नीम पेंड मिसळावी. या मिश्रणाला ‘Universal Potting Mixture’ असं म्हणतात. हे संपूर्ण मिश्रण पुन:रोपणाच्या किमान एक आठवडा आधी तयार करून ठेवावं, तसेच त्यात दमटपणा राखण्यासाठी त्यावर पाणी शिंपडावे. सेंद्रिय खत आणि नीम पेंड योग्य विघटनासाठी तसेच सर्व मिश्रण एकजीव होण्यासाठी हे गरजेचं आहे.
तयार केलेलं मातीचं मिश्रण कुंडीत भरण्याआधी कुंडीच्या तळाशी छिद्र करून त्यात विटांचे तुकड्यांचा थर टाकावा आणि त्यावर नारळ्याच्या किश्या ठेवाव्यात जेणेकरून मातीची धूप होणार नाही.
आता ज्या झाडाचं पुन:रोपण करायचं आहे त्या कुंडीतील माती योग्य हत्यार वापरून सर्व बाजूने थोडी मोकळी करावी. जुन्या कुंडीतून झाड काढण्यापूर्वी एका हाताने कुंडी उलटी करून व कुंडीच्या तळाशी हलकी थाप मारून मातीच्या गोळ्यासह झाड बाहेर काढावे. या दरम्यान रोपाला जोरात ओढण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळे रोपाला आणि त्याच्या मुळाना इजा पोहचू शकते. मुळांना चिकटलेली माती तशीच राहू द्यावी आणि बाकी सर्व माती बाजूला करावी. नवीन कुंडीत लावण्याआधी कुजलेली, मेलेली, एकमेकात गुरफटलेली मूळं छाटून टाकावीत. तसेच झाडावरच्या जुन्या, जादा वाढलेल्या फांद्या आणि पाने पण छाटून झाडाला हवा तसं आकार द्यावा.
माती मिश्रण भरून तयार केलेली नवीन कुंडी निम्मी मोकळी करावी, मग त्यात हे रोप मध्यभागी लावावे आणि उर्वरित माती मिश्रण त्यावर पसरवावे. तसेच गरज असल्यास रोपाला काठीचा आधार द्यावा. त्यानंतर नव्या कुंडीतील झाडाला झारीच्या सहाय्याने मुबलक प्रमाणात पाणी द्यावे. पुन:रोपण केलेली रोपं नवीन मुळं प्रस्थापित करेपर्यंत किमान एक आठवडा तरी सावलीत ठेवावीत आणि मग त्यानंतर त्यांचं सूर्यप्रकाशात स्थलांतर करावं. अशाप्रकारे जास्वंद, गुलाब, मोगरा, अनंत, रातराणी अशा बहुवार्षिक फुलझाडांचं आणि इतर शोभिवंत झाडांचं पुन:रोपण दर १ किंवा २ वर्षांनी करावं.
पुढील भागात आपण कुंडीची देखभाल आणि जुन्या कुंडीतील मातीचा वापर या बद्दल माहिती घेऊयात.
-विवेक काटे (Horticultural Botanist, संचालक: नेचर फर्स्ट हॉर्टीकल्चरस.)
बागकामासाठी लागणारी सेंद्रिय आणि नैसर्गिक खते, कीडनाशके, मातीची मिश्रणे, भाजीपाला बियाणे ऑनलाईन विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा, अथवा व्हाॅट्सएपवर ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये जरूर कळवा.
अशाच पद्धतीचे माहितीपर ब्लॉग वाचण्यासाठी मला follow करा, आमच्या वेबसाईटला भेट द्या,
-हर्षद ऐनापुरे, (M.Sc. Botany, SET), संचालक: नेचर फर्स्ट हॉर्टीकल्चरस.
Call/ WhatsApp: 9326166338/ 8169716382
खूपच छान माहिती....thank you हर्षद
ReplyDeleteबारकाईनं दिलेली महत्त्वाची माहिती....धन्यवाद विवेक, धन्यवाद हर्षद !!
ReplyDeleteखूप छान सविस्तर माहिती दिलीत. धन्यवाद! पुढील भागाची वाट पाहतोय.
ReplyDeleteVery informative.
ReplyDeleteVery informative.
ReplyDeleteThanks.