Sunday, May 6, 2018

तुळशींचे विविध प्रकार व त्यांचे औषधी उपयोग.हा ब्लॉग जर तुम्ही मोबाईलवर वाचत असाल तर स्क्रीन आडवी केल्यास वाचनास सोयीस्कर ठरेल.


नावात काय आहे असं म्हणताय? मग तुम्ही ऐकलेले तुळशीचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांना दिलेली अनेक
नावे यांची एक लिस्ट बनवा. तुम्हाला असं लक्षात येईल की लिस्ट खूप मोठी आणि कन्फ्युजिंग आहे. त्यात
भरीस भर म्हणून इंटरनेटवर अनेक “तज्ञांनी” तुळशींचे अंदाधुंद पद्धतीने नामकरण केले आहे. तेवढे करून
झाले की मग ही झाडं नक्की ओळखायची कशी, व त्यांचे नेमके औषधी गुणधर्म कोणते? असे सवाल निर्माण
होतील….असो.

हा गोंधळ दूर करण्यासाठी आपण वनस्पतीशास्त्राचा आधार घेऊयात. गावोगावी कितीही नावे पडली तरी
प्रत्येक वनस्पती ही जगभर एकाच शास्त्रीय नावाने (botanical name) ओळखली जाते. शास्त्रशुद्ध पद्धतीने
आणि तपशीलवारपणे तपासले तर काय सापडते? तर होय, तुळशीच्या अनेक प्रजाती आहेत, त्यातील बहुतेक
प्रजाती Ocimum या वंशात मोडतात. इंग्रजीत सगळ्या तुळशींना सरसकटपणे Basil (बेसिल) या नावाने
संबोधले जाते.


तुळस वाढवण्याबद्दल सर्वकाही जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा: ‘घरातील तुळस कशी जागवावी?’


प्रत्यक्षात झाड पाहणे आणि फोटो बघून झाड ओळखणे यात बराच फरक आहे. तरीही या ब्लॉगमध्ये दिलेल्या
फोटोंमुळे गोंधळ दूर करण्यासाठी नक्कीच मदत होईल.

महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या तुळशीच्या प्रजाती व त्यांचे औषधी उपयोग खालील प्रमाणे:

1. Ocimum tenueflorum (Holy Basil) केवळ ‘तुळस’ असे म्हटले तर हीच प्रजाती प्रामुख्याने समोर येते. घराघरात वाढणाऱ्या बहुगुणकारी अशा या तुळशीच्या  खालील दोन उपप्रजाती आहेत: 

कृष्ण तुळस किंवा काळी तुळस 

1a. कृष्ण तुळस: या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात.
उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडा मध्ये हा रंग जास्त ठळक पणे उठून दिसतो. याच तुळशीला काळी तुळस
असेही संबोधतात. 

लक्ष्मी तुळस किंवा श्री तुळस 

1b. लक्ष्मी तुळस: तुळशीच्या या दुसर्या उपप्रजातीची पाने, खोड व कोवळ्या मंजिऱ्या हिरव्या रंगाच्या असतात.
हा हिरवागार रंग पावसाळी वातावरणात वाढलेल्या नवीन रोपांमध्ये उठून दिसतो. याच तुळशीचे श्री तुळस
सेही नाव आहे.

वरील दोन्ही प्रकारच्या तुळशींचे औषधी उपयोग:
  • पानांचा रस कानदुखीवर वापरतात.
  • पोटातील गॅस नाहीसा करण्यासाठी पानांचा काढा घ्यावा.
  • हिरड्यातील पू आणि मुखदुर्गंधी निवारण्यासाठी ३-४ पाने तोंडात धरावित.
  • तुळशीची पाने व सुंठ चहात टाकून चहा घेतल्यास ताप, सर्दी व खोकल्याचा विकार कमी होतो 
  • बियांचा उपयोग लघवीचा सर्व रोगांवर होतो 
  • तुळशीचे तेल कीटकनाशक, जीवाणूनाशक म्हणून व डास दूर ठेवण्यास उपयुक्त आहे.
  • तुळस आणि आले घालून लिंबाचे सरबत छान होते.
राम तुळस

2. Ocimum gratissimum,
राम तुळस: मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी ही तुळस.
हिच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी उपयुक्त अशी ही प्रजाती
लवंगी तुळस म्हणूनही ओळखली जाते.

कापूर तुळस 

3. Ocimum kilimandscharicum, कापूर तुळस:
या तुळशीच्या पानांना कापराचा सुंगंध येतो. या
तुळशीच्या तेलामध्ये ६० ते ८० % कापराचे प्रमाण असते. सर्दी, कफ, खोकला व चोंदलेल्या नकासाठी पाने
टाकून वाफ घेतली जाते. हर्बल टी  बनवण्यासाठी ही तुळस उपयुक्त.

वन तुळस किंवा रान तुळस 

4. Ocimum americanum, वन तुळस: अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी
आहे. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो; न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. नाव
‘अमेरिकानम’ असले तरी ही भारतीय वंशाची तुळस आहे. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे
‘रान तुळस’ असेही नाव आहे.

5. Ocimum basilicum: इंग्रजीत या प्रजातीच्या तुळशिंना ‘बेसिल’ या सामान्य नावाने ओळखले जाते.
त्यातील खालील दोन उपप्रजाती भारतात वाढवल्या जातात: 

सब्जा

5a. सब्जा (Sweet Basil):
आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा
देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू
शकत नाही. तसेच अंग दुखून येणाऱ्या उन्हाळी ज्वारात, पाने व बिया सरबतात घालून प्यायल्यास बरे वाटते.
विंचू व इतर दंशावर पाला चुरडून लावता येतो.

बेसिल 

5b. बेसिल हर्ब:  
गेल्या काही वर्षात, मुंबई-पुण्या सारख्या शहरांमध्ये इटालियन बेसिल हे हर्ब भाजीपाला बागेत
लावले जाते. बेसिलच्या ओल्या व सुक्या पानांचा वापर पिझ्झा-पास्ता सारख्या पदार्थांमध्ये विशेष स्वादासाठी
केला जातो. या बेसिल हर्ब मध्येही अनेक प्रकार आहेत.

लेमन तुळस 

6. Ocimum africanum लेमन तुळस: हि एक संकरीत जातीची तुळस असून तिच्या पानांना गवती चहा
प्रमाणे लिंबाचा वास येतो. थाय फूड मध्ये लेमन तुळशीचे विशेष महत्व आहे. तुळशीच्या कुळात ‘लेमन बाम’
नावाचे सुद्धा एक झाड असून ते याहूनही वेगळे.

विक्स तुळस 

7. Mentha arvensis विक्स तुळस: मुलतः ही तुळस नाहीच. ‘पुदिना’ किंवा ‘मिंट’ या प्रकारातील ही एक
सुगंधित-औषधी प्रजाती महाराष्ट्रात विक्स तुळस म्हणून अनेक रोपवाटिकांमध्ये विकली जाते. कारण तिच्या पानांना विक्स बामचा सुवास येतो असा दावा केला जातो.

या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला तुळशीचे इतर प्रकार माहित असतील तर कमेंट्स मध्ये जरूर कळवा. 
अशाच पद्धतीचे माहितीपर ब्लॉग वाचण्यासाठी मला follow करा, आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा.


-हर्षद ऐनापुरे, (M.Sc. Botany, SET), संचालक: नेचर फर्स्ट हॉर्टीकल्चरस.
Email ID: harshad.naturefirst@gmail.com