Friday, January 18, 2019

‘चंद्रज्ञान’: बागकाम आणि चंद्राचे विलक्षण नाते.


गेल्या आठवड्यात चीनी वैज्ञानिकांनी चंद्रावर कापसाचे बी रुजवल्याची बातमी ऐकली. तेव्हापासून विचार करत होतो की आपण चंद्राला अंडरएस्टिमेट करतो की काय. चंद्राचं प्रेमाशी अतूट नातं आहे. बागेचंही प्रेमाशी खास नातं आहे. अनेक कविता आणि गीतरचनांमधून आपल्याला याची प्रचीती आलीच असेल. पण चंद्राचं आणि तुमच्या बागेचही काही विशेष नातं आहे का? हे शोधण्याचा जेव्हा मी प्रयत्न केला तेव्हा मला काही इंटरेस्टिंग माहिती मिळाली; खरं तर एका वेगळ्या शास्त्राचाच शोध लागला असं समजा. या शास्त्राला म्हणतात ‘चंद्रज्ञान’. चंद्रज्ञान म्हणजे चंद्राच्या बदलत्या कलांप्रमाणे बागकामाचे वेळापत्रक निर्धारित करणे.

चंद्राची तत्कालीन अवस्था पाहून त्याप्रमाणे बाग-बगीचाशी संबंधित ठराविक कामे निवडणे ही युक्ती बरीच जुनी आहे. युरोपातील बागकामप्रेमी या शास्त्राकडे आदराने पाहतात आणि त्याचा एखाद्या परंपरेप्रमणे सराव करतात. वनस्पतींच्या वाढीवर चंद्राचा थेट परिणाम होतो की नाही, या प्रश्नाचे अजूनही ठोस वैज्ञानिक उत्तर मिळालेले नाही. परंतु शेकडो वर्षांपासून युरोपातील कुशल उद्यानविद्या-तज्ञ आणि अव्वल दर्जाचे हौशी बागकामप्रेमी प्रामणिकपणे या शास्त्राचे यशस्वीरीत्या पालन करत आलेले आहेत.

 अमावस्या,    शुक्ल पक्ष,    पौर्णिमा,      कृष्ण पक्ष,    अमावस्या.
चंद्राच्या कला 

चला तर मग, आपणही पाहूयात की चंद्रज्ञानाचा वापर आपण आपल्या घर-बागेत, परस बागेत, किचन गार्डनमध्ये कसा करू शकतो ते:

कलम आणि अमावस्या:
कोणत्याही प्रकरचा कलम हा अमावस्येच्या काळात करावा असे हे शास्त्र सांगते. कारण अमावस्या ते पौर्णिमा या शुल्क पंधरवड्यात जेव्हा चंद्र मोठा होत जातो, ह्या काळात झाडांच्या अन्नरस अभिसरणाची क्रिया उत्तेजित होते आणि नव्या शाकीय कळ्यांची (डोळ्यांची) वाढ जोमाने होते. म्हणूनच आंबा, चिकू, पेरू अशा फळझाडांच्या रोपांवर जर कलम (grafting) करायचा असेल तर तो अमावस्येच्या दिवशी करावा. हीच खुण ध्यानात ठेवून, जास्वंदीचा गुटी कलम (air layering), वा गुलाबाचा डोळा कलम (eye budding) सुद्धा अमावस्येच्याच मुहूर्तावर करावा.

छाटणी आणि शुक्ल पक्ष:
फळझाडांची, फुलझाडांची इतर वृक्षांची छाटणी ही साधारण पावसाळा सुरु होण्याच्या अगोदर मे महिन्यात केली जाते. चंद्रज्ञान शास्त्रात अशी समजूत आहे की या प्रकारची छाटणी ही शुक्ल पक्षात म्हणजे वाढत्या चंद्राच्या पंधरवड्यात कधीही करावी. असे केल्याने नवीन पालव्या फुटण्यास मदत होते.

पेरणी, लागवड आणि चंद्र-कला:
जुन्या काळातील जाणकार माळी असा सल्ला देतात की शुक्ल पक्षातच (पौर्णिमेच्या साधारण दोन दिवस अगोदर) बहुतेक प्रकारच्या भाजीपाल्याची पेरणी किंवा लागवड करावी. याला अपवाद आहे कोबीवर्गीय भाज्या, ज्यांची पेरणी/लागवड कृष्ण पक्षात किंबहुना पौर्णिमेच्या दिवशी करावी, म्हणजे पौर्णिमा ते अमावस्या या कृष्ण पंधरवड्यात कोबी, फ्लावरच्या बियांची रुजवण चागली होईल.



चंद्रीय लागवडीचा तक्ता:

दिवस
कृती
पिक
पौर्णिमा
बी पेरणी
कोबी, फ्लावर, गाजर, कांदा, बीट, मुळा, पालक, लेट्युस.
रोप लागवड
बटाटा, टोमॅटो, वांगी, भोपळी मिरची.
पिक तोडणी/कापणी
सर्व प्रकारची फळं, भाज्या आणि हर्बस.
शुक्ल त्रयोदशी
बी पेरणी
मका, चवळी, फरसबी, भुईमुग, वाटाणा, कोथिंबीर आणि हर्बस.


पौर्णिमेची रात्र आणि तण/गवत वेणणी:
वरील नमूद केलेली सर्व बाग-बगीचाची कामं जरी चंद्राच्या कलांकडे पाहून ठरवण्यात येत असली तरी प्रत्यक्ष कृती ही दिवसाच करायची असते. तथापि काही जर्मन वनस्पतीशास्त्रज्ञांच्या मते बागेतील गादी-वाफे तयार करताना माती खणायचं काम रात्री चंद्राच्या प्रकाशात केलं, तर नंतर त्या ठिकाणी तणांचा प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात होते. ते यापुढे असंही म्हणतात की गवत काढायचं/ तणांची वेणणी करायचं काम पौर्णिमेच्या रात्री केलं तर ते जास्त परिणामकारक ठरतं.



चंद्र आणि हवामानाचा झटपट अंदाज:
खुद्द चंद्राचा आपल्या हवामानावर फारसा परिणाम होत नसेलही, पण आकाशातील चंद्राकडे पाहून आपल्याला हवामानाचे आश्चर्यकारकरित्या अचूक अंदाज बांधता येतात. उदाहरणार्थ जर चंद्राभोवती खळं/वलय दिसत असेल किंवा चंद्राच्या कडा धूसर दिसत असतील तर येत्या काही तासांत पावसाची शक्यता आहे असे समजावे. मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळी येणाऱ्या अवकाळी पाउस/वादळाची सूचना आपल्याला अशा पद्धतीने मिळवता येऊ शकते. याउलट कडक हिवाळ्यातील निरभ्र आकाशात जेव्हा स्वच्छ आणि स्पष्ट चंद्र दिसत असतो तेव्हा रात्री दवबिंदू गोठून झाडं थंडीने करपण्याची शक्यता असते, म्हणजेच झाडांना हिम-इजा होण्याची शक्यता असते. याच ऋतुत जर चंद्राच्या कडा पुन्हा अस्पष्ट दिसू लागल्या तर हिम-दवाचा अवधी संपत आला असं समजायचं. 

चंद्राचे खळे म्हणजे पावसाचे सूचक 


चंद्र आणि पृथ्वीच्या नात्यामध्ये अजून अनेक गुपीत दडलेली आहेत. त्यांचा वैज्ञानिक छडा पुढेमागे लागेलही, पण तो पर्यंत अनुभवाने निर्माण झालेल्या अशा ज्ञाचा वापर करण्यास काहीच हरकत नाही.


Ref: Reader's Digest.

टीप: वरील माहितीचा ज्योतिषशास्त्राशी किंवा पंचांगाशी काहीही संबंध नाही. भारतीय संस्कृतीत पंचांग व नक्षत्र पाहून ठराविक मुहुर्तांवर धान्याची पेरणी करायची प्रथा आहे. ते एक स्वतंत्र ज्ञानाचे क्षेत्र असून, वेगळ्या ब्लॉगचा विषय आहे.


तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये जरूर कळवा.
अशाच पद्धतीचे माहितीपर ब्लॉग वाचण्यासाठी मला follow करा,
आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा.


-हर्षद ऐनापुरे, (M.Sc. Botany, SET), संचालक: नेचर फर्स्ट हॉर्टीकल्चरस.
Email ID: harshad.naturefirst@gmail.com

No comments:

Post a Comment