Thursday, August 16, 2018

पिठ्या ढेकुण म्हणजेच मिलीबग्सचा करा समूळ नायनाट (भाग २- शत्रूशी दोन हात)



हा ब्लॉग जर तुम्ही मोबाईलवर वाचत असाल तर स्क्रीन आडवी केल्यास वाचनास सोयीस्कर ठरेल.

मिलीबग्स वरील ब्लॉग्सच्या मालिकेतील हा माझा दुसरा ब्लॉग आहे. मिलीबग्सचा उपद्रव, प्रादुर्भावाचे निदान,

मिलीबग्सचे जीवनचक्र, प्रादुर्भावाचा परिणाम, त्यात असलेली मुंग्यांची भूमिका, बागेतील झाडांचे नुकसान
करणारा एक कीटक म्हणून मिलीबग्सची क्षमता या आणि अशा महत्वपूर्ण गोष्टी वाचण्यासाठी येथे क्लिक
करा (भाग १).


मिलीबग्सचा प्रतिबंध करण्यासाठी या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:
  • संसर्गाचे निदान जेवढ्या लवकर होऊ शकेल तेवढे चांगले. तुमच्या बागेतील झाडांचे, नवीन पानांचे, कळ्यांचे, फळांचे नियमितपणे बारकाईने निरीक्षण करत जा.
  • मिलीबगच्या झाडांवर लपायच्या जागा, म्हणजेच पानांच्या खालची बाजू, खोडांमधील सगळे कोपरे, कोनाडे, माती इ. नीट तपासून पहा.
  • एखाद-दुसरे मिलीबग्स असतील तर त्यांना (कान कोरायचे) कॉटन बड्स वापरून काढून टाका. बड्स  वापरण्याआधी ते स्पिरीटमध्ये बुडवून घ्या.

  • इंडोअर प्लांट्सची शोभिवंत पाने नियमितपणे स्पंजने पुसून काढा.
  • मुंग्या मिलीबाग्सचा प्रसार करतात तेव्हा सर्वप्रथम  मुग्यांचा बंदोबस्त करा. हळद, राख, सीताफळ बियांची पावडर इ. झाडांभोवतीच्या मातीवर भुरभुरून मुंग्यांना पळवून लावा.
  • घरातील झाडांचे वर्षातून एकदा रिपॉटिंग करा. दरवर्षी नवी कुंडी, नवी माती वापरल्यास मिलीबग्सना लपायला  जागा राहत नाही.
  • कोणत्याही परिस्थितीत रासायनिक (केमिकल) कीडनाशकांची फवारणी करू नका.


मिलीबग्सच्या  नियंत्रणासाठी काही घरगुती व  सेंद्रिय उपाय:


मिलीबग्स घालवण्यासाठी सर्वात सोपे आणि उपयुक्त सोल्युशन म्हणजे पाणी. मऊ शरीर व सैल पकड
यामुळे पाण्याच्या जोरदार प्रवाहाने मिलीबग्स  झाडावरून वाहून जाऊ शकतात. पाण्याची नियंत्रित पण
शक्तिशाली धार स्प्रेयरचा नोझेल ट्यून करून निर्माण करता येऊ शकतो. किंवा पाईपने प्रेशर असलेले पाणी
फवारता येते. झाडांना नुसती अंघोळ घातली वा निव्वळ धुवून काढले तरी मिलीबग्स तात्पुरते वाहून जातात.




परंतु एवढेच पुरेसे नाही. मिलीबग्स दूर निघून जावेत व पुन्हा येऊ नयेत या साठी खालील फवारणी करायला
हवी:


नीम ओईल स्प्रे:
  • एका बाटलीत १ लिटर पाणी घ्या. 
  • त्यात २ चमचे द्रवरूपी साबण (लिक्विड सोप) टाका. त्यासाठी लिक्विड डिशवॉश किंवा प्लांट शाम्पू वापरू शकता.
  • नंतर त्यात १० मिली कडूनिंबाचे तेल (नीम ओईल) मिसळा.
  • ह्या मिश्रणाचे दुधाळ द्रावण होईपर्यंत बाटली शेक करून घ्या.

  • फवारणी: हे तयार औषध महिन्यातून एकदा तुमच्या बागेतील सर्व झाडांवर फवारा.
  • फवारणीसाठी नेहमीचा लहान स्प्रेयर वापरा.
  • मिलीबग्सना नियंत्रणात ठेवण्यासाठी ही फवारणी अतिशय प्रभावी ठरते.
  • वरील द्रावणात ३-४ चमचे अल्कोहोल (इथेनॉल) मिसळल्यास औषध अधिक परिणामकारक ठरते.




जैविक उपाय:


मिलीबग्सचे काही नैसर्गिक शत्रू आहेत, ज्यांना आपण मित्र मानू शकतो. खालीलप्रमाणे यांचा योग्य पद्धतीने
आपल्या बागेत उपयोग करता येऊ शकतो:
  • लेडीबर्ड बीटल: या प्रकारचे अनेक क्युट दिसणारे किडे मिलीबग्सची शिकार करून त्यांच्यावर ताव मारतात. त्यापैकी  Cryptolaemus montrouzieri या प्रजातीचा किडा ‘मिलीबग विनाशक’म्हणून प्रसिद्ध आहे.

  • Leptomastidea abnormis: या जातीची छोटीशी गांधीलमाशी मिल्बग्सच्या शरीरात अंडी घालते. त्यातून निघालेल्या अळ्या मिलीबग्सना आतून खाऊन टाकतात.
  • Lecanicillium lecanii: हि एक प्रकारची बुरशी असून मिलीबग्सना तिचा संसर्ग झाल्यास आजारी पडून ते मरतात.
जैविक मार्गाने मित्रजीव बागेत/शेतात सोडण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. या पद्धतीचे उपाय तुम्ही मोठ्या परसबागेत, सेंद्रिय शेतीत, फार्म-हाउस, ग्रीनहाउस अशा ठिकाणी करू शकता.


“नीमास्त्र” मिलीबग्स वरील रामबाण उपाय:


ZBNF म्हणजेच झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक, कृषि-हृषी, पद्मश्री सुभाष पाळेकर गुरुजींनी नीमास्त्र
ह्या ज़ालीम औषधाची निर्मिती केली आहे. नीमास्त्र हे कडूनिंबाच्या पानांपासून तयार केलेले एक नैसर्गिक
कीटक-नाशक होय. याच्या वापरने निसर्गाला, पर्यावरणाला व तुमच्या स्वास्थ्याला कोणतीही हानी पोचणार नाही.


एका सर्वसामान्य आकाराच्या घरबागेसाठी पुरेल एवढे निमास्त्र बनवण्याची कृती:
  • एका बादलीत १० लिटर पाणी घ्या. त्यात ५०० मिली देशी गायीचे गोमुत्र मिसळा. 
  • नंतर त्यामध्ये १०० ग्राम देशी गायीचे ताजे शेण हाताने चांगले मिसळून घ्या. 
  • नंतर अर्धा किलो कडूनिंबाच्या पानांची चटणी बनवून त्या पाण्यात टाका व चांगले ढवळून घ्या. 
  • हे द्रावण २४ तास सावलीमध्ये आंबवत ठेवा. 
  • दिवसातून दोन वेळा डावीकडून उजवीकडे ढवळा. 
  • २४ तासंनातर हे द्रावण फडक्याने गाळून घ्या; आणि नीमास्त्र औषध तयार.
फवारणी: निमास्त्र हे समप्रमाणात (१:१) पाण्यात मिसळून मिलीबग्सचा प्रादुर्भाव झालेल्या झाडावर पानांवर
फवारा. एका फवारणीत मिलीबग्सचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त होईल. १५-१५ दिवसांच्या अंतराने २ ते ३
फवारण्या केल्यास तुमच्या बागेतून मिलीबग्सचे जवळ जवळ उच्चाटन होईल.


नैसर्गिक शेतीच्या तत्वानुसार प्रत्येक शेतक-याने स्थानिक सामग्री वापरून स्वतःहून आपल्या शेतात नीमास्त्र
तयार करावे अशी शिफारस करण्यात आली आहे. हा नियम बागकाम प्रेमींनाही लागू होतो. परंतु शहरी
भागातील गैरसोय, योग्य सामग्रीच्या उपलब्धतेचा अभाव, वेळेचा अभाव, जागेची कमतरता, व इतर काही
मर्यादांमुळे तुमची बाग नीमास्त्र या मौल्यवान औषधापासून वंचित राहू नये अशी आमची इच्छा. त्यासाठी
आम्ही तुमच्यासाठी वापरण्यासाठी तयार  नीमास्त्र उपलब्ध करून देत आहोत. ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी
येथे क्लिक करा


नीम अस्त्र चा ५०० मिली चा कॅन

बागकामासाठी लागणारी  सेंद्रिय आणि नैसर्गिक खते, कीडनाशके, मातीची मिश्रणे, भाजीपाला बियाणे ऑनलाईन विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा, अथवा व्हाॅट्सएपवर ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये जरूर कळवा.

अशाच पद्धतीचे माहितीपर ब्लॉग वाचण्यासाठी मला follow करा, आमच्या वेबसाईटला भेट द्या,

आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा.

-हर्षद ऐनापुरे, (M.Sc. Botany, SET), संचालक: नेचर फर्स्ट हॉर्टीकल्चरस. 

Call/ WhatsApp: 9326166338/ 8169716382


1 comment:

  1. Very nice information please send me what'sup 9921269626

    ReplyDelete