तुळस... भारतातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वज्ञात वनस्पती. अगदी गजबजलेल्या शहरांत, गल्ली-बोळातील रोपवाटिकांमध्ये सुद्धा तुळशीचीच रोपं सर्वात जास्त विकली जातात. हल्ली तर वेगवेगळ्या सार्वजनिक किंवा खासगी इवेन्ट्स् मध्ये तुळशीची रोपं भेट म्हणून दिली जातात. कारण बागकामाची विशेष आवड नसणारे लोक सुद्धा घरात तुळशीचे रोप जरूर लावतात. घरबागेत, अंगणात, तुळशीवृंदावनात, गच्चीवर, बाल्कनीत, किंवा खिडकीत सुद्धा तुळस लावता येते.
आपल्या दारात लावलेली तुळस ही भरगच्च, हिरवीगार, दाट, डौलदार, झुबकेदार असावी अशी सगळ्यांची इच्छा असते. प्रत्यक्षात मात्र खुरटलेली, रोगट, एखाद्या सुक्या काडी सदृश, एकाच दिशेने उंच वाढलेली किंवा मृत्यु-पंथाला लागलेली अशी तुळस अनेकांच्या घरी का बरं आढळते! विशेषतः शहरी भागात असे दृश्य दिसण्याची शक्यता जास्त असते. असे का होते व आपण ते कसे टाळू शकतो याचे उत्तर आपण या ब्लॉग मध्ये शोधणार आहोत.
‘हिंदू धर्मातील तुळशीचे महत्व’,’तुळशी विवाह’, ‘पूजा-पाठ व धार्मिक विधींच्या वेळी करायचा तुळशीपत्रांचा वापर’, ‘तुळशीचे औषधी गुणधर्म व आयुर्वेदातील स्थान’; या आणि अशा अनेक विषयांवर आज नेटवर मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. या ब्लॉग मध्ये आपण कुंडीत तुळस कशी लावावी, तिची योग्य निगा कशी राखावी, व ती जास्तीत जास्त काळ कशी जगवावी याची माहिती घेणार आहोत.
तुळशीची ओळख:
तुळस ही Lamiaceae (Labiatae) या कुळातील द्विदल वनस्पती असून तिचे वैज्ञानिक नाव आहे, Ocimum tenuiflorum (जुने नाव: O. Sanctum). पुदिना, पान-ओवा, पाचौली, ओरेगानो, लवेंडर अशा सुगंधित पानांच्या वनस्पती या तुळशीच्याच कुळातील आहेत. तुळशीचे झाड साधरणतः ७५ ते ९० सेमी पर्यंत वाढू शकते. तुळशीचे झाड हे ‘सरळ वाढणारे शाकीय व लहान झुडप’ (Erect branched herb) या वर्गात मोडते.
तुळस ही मूळतः एक वर्षायू (annual) वनस्पती असली तरी भारतात ती अल्पकाळ जगणारी बारमाही ( short lived perennial) वनस्पती म्हणून वाढवली जाते. तुळशीचे आयुष्य साधारण २ ते ३ वर्षांचे असते. परंतु अनुकूल परिस्थितीत, अतिशय जोमाने वाढणारे तुळशीचे झाड याहूनही अनेक वर्ष यशस्वीरीत्या जगू शकते.
घरात लावण्यासाठी बहुतेक वेळा तुळशीचे तयार रोप थेट नर्सरी मधून आणले जाते. पण जर तुमच्याकडे साठवलेल्या बिया असतील, तर त्या पेरून नक्कीच तुळशीच्या रोपांची अभिवृद्धी करता येते. जुन्या खोडाच्या जाडसर छाटापासूनही नवे रोप होऊ शकते.
बी पेरणे:
तुळशीच्या बिया आकाराने अतिशय लहान असतात. बिया थेट कुंडीत किंवा जमिनीत पेरू नयेत. सीडलिंग ट्रे किवा कोणत्याही उथळ ट्रे मध्ये कोकोपीट भरून त्यावर बिया पेराव्यात. पेरलेल्या बिया कोकोपीटच्या बारीक थराने झाकाव्यात. पेरणी नंतर झारीने पाणी घालावे. साधारणतः ८ ते १२ दिवसांमध्ये बियांची उगवण होते. रोपांना महिन्याभरात ५ ते ६ पाने आली की रोपे कुंडीत लावायला तयार झाली असे समजावे.
कुंडी:
तुळशीला १० ते १२ इंच व्यासाची व किमान १ फूट उंचीची कुंडी योग्य आहे. हल्ली प्लास्टिकच्या कुंड्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत व त्या वापरायला काही हरकत नाही. परंतु मातीची कुंडी तुळशीच्या झाडाला जास्त सुखदायक ठरते यात शंकाच नाही. कोणतीही कुंडी असो, त्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी कुंडीच्या बुडाशी छिद्र असावे. कुंडीच्या तळाशी विटांच्या तुकड्यांचा (७ ते ८ तुकडे) एक थर करावा. हा थर सुकलेल्या पानांनी (२-३ सें. मी.) झाकून टाकावा. त्यानंतरच मातीचे मिश्रण भरावे. तुळशीवृंदावन सुद्धा एखाद्या कुंडी प्रमाणेच भरावे, येथे मात्र तुटलेल्या विटांचा थर जास्त जाड असावा.
माती आणि खताचे मिश्रण:
तुळशीसाठी दोन भाग माती आणि एक भाग शेणखत यांचे मिश्रण कुंडी भरण्यासाठी वापरावे. पोयटा (Loam) प्रकारची लाल किवा तपकिरी माती सर्वोत्तम ठरते. काळी भारी माती, चिकणमाती किंवा हलकी वाळूची माती वापरू नये. सेंद्रिय खत म्हणून कुंडीच्या मिश्रणात पूर्णपणे कुजवलेले शेणखत वापरावे. कृपा करून ताजे ताजे शेण किंवा सुकलेल्या शेणाची भुकटी वापरू नका.
कुंडीत रोप लावणे:
कुंडी भरून झाल्यावर लागवड करण्याकरता योग्य त्या रोपाची निवड करावी. ते रोप प्लास्टिकच्या पिशवीत असेल तर पिशवी ब्लेडने फाडून झाड मातीच्या गोळ्यासहित धरून कुंडीच्या मध्यभागी ठेवावे. पुन्हा खत व मातीच्या मिश्रणाने उर्वरित कुंडी भरावी. मात्र कुंडीच्या वरचा ५ सेमी. इतका भाग रिकामा ठेवावा. कुंडीत झाड लावल्याबरोबर पाणी द्यायचे विसरू नये.
सूर्यप्रकाश:
तुळस हे लख्ख सूर्यप्रकाशात वाढणारे झाड आहे. तुळशीच्या झाडाला जास्तीत जास्त उजेड मिळेल अशा ठिकाणी ठेवावे. दिवसाला ६ ते ८ तासांचे ऊन तुळशीच्या वाढीसाठी सर्वोत्तम. जर तुम्ही तुळस खिडकीत लावत असाल तर कमीत कमी ३ ते ४ तासांचे ऊन तरी झाडाला मिळावे. त्याहूनही कमी सूर्यप्रकाशात झाड जगू शकते, पण अशा झाडाची वाढ योग्य पद्धतीने होत नाही आणि कीड-रोग लागण्याची शक्यताही जास्त असते.
पाणी:
तुळशीला नियमित पण माफक प्रमाणात पाण्याची गरज असते. चिखल होईल एवढे पाणी अजिबात घालू नये. जास्त पाण्यामुळे पाने पिवळी पडू शकतात. मातीत पाणी फार काळ साठून राहिले तर झाड मरूही शकते. तुळशीला पाणी शॉवर असलेल्या झारीने द्यावे. कमंडलू/तांब्या/लोटा/मग यांनी पाणी देऊ नका. पाण्याची धार मोठी असल्यास मुळे उघडी पडतात.
छाटणी (खुडणी):
तुळशीचे रोप लहान असताना सरळ वाढणाऱ्या रोपाचा शेंडय़ाकडील भाग आपल्या बोटांनी खुडावा (मोडून काढावा). अशा रीतीने दर दोन आठवडय़ांनी वरचे एक-दोन शेंडे खुडल्यास त्याच्या खालून फांद्या फुटून, नवीन फांद्या व पानांची संख्या वाढते व तुळस डेरेदार होते. हे लक्षात ठेवा की या प्रकारे छाटणी न केल्यामुळेच तुळस एकाच दिशेने उंच वाढत जाते.
मंजिऱ्या आवरा:
तुळशीची वाढ तीन महिन्यांत पूर्ण होते त्यावेळी रोपाची उंची अंदाजे दोन फूट असते, त्यानंतर तुळशीला फुलांचे तुरे म्हणजेच मंजिऱ्या येण्यास सुरुवात होते. तुळशीला फुले आल्यानंतर तिच्या फांद्या अधिक जून होतात. तसेच झाडाची वाढही थोडी मंदावते. कारण झाडातील सर्व अन्नघटक बी बनण्यासाठी वापरले जातात. म्हणूनच तुळशीच्या फुलांचे तुरे लहान असतानाच काढून टाकावेत. सतत येत राहणाऱ्या मंजिऱ्या खुडल्यामुळे नवीन पानांची वाढ जोमात होते व झाड बरेच दिवस हिरवेगार राहते. तुळशीवर मंजिऱ्यांची संख्या मर्यादित ठेवल्यास तिचे आयुष्य वाढते, म्हणून झाड व्यवस्थित वाढल्यानंतरच केवळ एक दोन मंजिऱ्यांचे तुरे वाढून द्यावेत.
वरील कृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच वरवर पाहता छान वाढणारी तुळस अचानक मृत्यु-पंथाला लागते. लहान रोपाला गरजेपेक्षा जास्त मंजिऱ्या येऊ दिल्यामुळेच तुळशीचे झाड लवकर मरते.
खत:
तसं बघायला गेलं तर तुळशीला खताची गरज नसते. तरीही तुळशीच्या कुंडीत वर्षांतून २ ते ३ वेळा मुठभर कुजलेले शेणखत मिसळावे. हे करताना वरची २ इंच माती सैल करून घ्यावी. त्यातील थोडी माती काढून त्यात शेणखत घालून मातीत ते नीट मिसळून घ्यावे. खत घातल्यानंतर पाणी घालावे. महिन्यातून एकदा जीवामृत दिल्यास तुळशीची वाढ जोमाने होईल. जर जीवामृत देत असाल तर कुंडीतील मातीला लाकडाच्या भुशाचे किंवा दैनंदिन निर्माल्यातील फुलांचे आच्छादन करावे.
खुरपणी:
अनेक वेळा तुळशीच्या कुंडीतील माती कडक झालेली दिसते, इतकी की सुकल्यावर तिला भेगा पडलेल्या दिसून येतात. अशा वेळी व्यवस्थित खुरपणी करून ही माती सैल करून घ्यावी. माती दगडासारखी कडक झाल्यास झाडाची मुळे गुदमरतात व त्यांच्यावर भौतिक दबावही येतो. या तणावामुळे तुळशीचे झाड मरू शकते. त्यामुळे तुळशीच्या कुंडीतील माती सतत खुरपणी करून सैल व भुसभुशीत ठेवावी.
रोग व कीड:
सर्वसामान्यपणे तुळशीवर रोग व कीड यांचा प्रादुर्भाव फारसा दिसून येत नाही. पण जास्त सावलीत लावलेल्या झाडांना कीड व रोगांची लागण होऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत तुळशीवर रासायनिक कीटकनाशके वा औषधे फवारू नका. घरगुती उपाय करून पहा. हळदीचे पाणी, पाण्यात मिसळेले आंबट ताक झाडावर शिंपडा किंवा फवारा. सर्वात महत्वाचे म्हणजे निदान ३-४ तास ऊन मिळेल अशा ठिकाणी झाड हलवा.
या व्यतिरिक्त आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की तुळस काही फॅन्सी प्रकारचे झाड नाही व तिला कुठल्याही
या व्यतिरिक्त आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की तुळस काही फॅन्सी प्रकारचे झाड नाही व तिला कुठल्याही
प्रकारच्या ‘स्पेशल ट्रीटमेंटची’ गरज नाही. काही तज्ञ तर असं सांगतात की तुळशीला एखाद्या दुर्लक्षित रानटी
वनस्पती प्रमाणे वाढून देणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे.
वनस्पती प्रमाणे वाढून देणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? तुळस जगवण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या युक्त्या वापरता? हे कॉमेंटस् मध्ये
नक्की कळवा. पुढील ब्लॉग मध्ये आपण ‘तुळशीचे विविध प्रकार व त्यांचे औषधी उपयोग’ यांची माहिती
मिळवूयात.
नक्की कळवा. पुढील ब्लॉग मध्ये आपण ‘तुळशीचे विविध प्रकार व त्यांचे औषधी उपयोग’ यांची माहिती
मिळवूयात.
बागकामासाठी लागणारी सेंद्रिय आणि नैसर्गिक खते, कीडनाशके, मातीची मिश्रणे, भाजीपाला बियाणे ऑनलाईन विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा, अथवा व्हाॅट्सएपवर ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये जरूर कळवा.
अशाच पद्धतीचे माहितीपर ब्लॉग वाचण्यासाठी मला follow करा, आमच्या वेबसाईटला भेट द्या,
आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा.
-हर्षद ऐनापुरे, (M.Sc. Botany, SET), संचालक: नेचर फर्स्ट हॉर्टीकल्चरस.
Call/ WhatsApp: 9326166338/ 8169716382